Maharashtra Talathi Bharti : `तलाठी भरती परीक्षा पुढे ढकला`, विद्यार्थी का करतायेत मागणी? वाचा...
Maharashtra Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरण आता थेट उच्च न्यायालय जाणार आहे. अशातच आता तलाठी परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय... मराठा आंदोलन
Maharashtra Talathi Bharti Exam 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान अनागोंदी कारभार सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्रभरातून विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. अशातच आता तलाठी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तलाठी भरती परीक्षेतील पेपरफुटी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पेपर फुटी प्रकरण आता थेट उच्च न्यायालय जाणार आहे. अशातच आता तलाठी परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय... मराठा आंदोलन... राज्यातील उद्या अनेक जिल्ह्यात बससेवा बंद असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.
उद्या तलाठी पदासाठीची परीक्षा असून एसटी सेवा बंद असल्यानं विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. राज्यात सगळ्या जिल्ह्यात उद्या तलाठी पदासाठीची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा होणार आहे. मात्र मराठा आंदोलनामुळे बससेवा बंद आहेत. नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक अश्या ठिकाणी आहेत. एसटी सेवा सुरू होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. तर दुसरीकडे परीक्षा घेणाऱ्या कंपनीने परीक्षार्थीना मेल पाठवला असून आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षेला हजर राहण्याची सूचना केलीय.
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेधार्थ उद्या सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चानं बैठक घेऊन हा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सातारा बंदची हाक देण्यात आलीय. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याची विनंती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलीय. त्यामुळे आता उद्या राज्यभर बंदला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थी परीक्षा देणार तरी कसे? असा सवाल विचारला जातोय.
दरम्यान, विद्युत उपकरणांच्या मदतीने ऑनलाइन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला होता. तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला अन् उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्य़ाची तयारी केली आहे.