निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे  : अभिनेता अजय देवगन याची मुख्य भूमिका असणारा तान्हाजी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. किंबहुना फार कमी वेळातच तान्हाजीने सर्वाच्याच मनात कायमचं स्थान मिळवलं. अशा या चित्रपटाला काही स्तरांतून विरोधही झाला. त्याच्या नावापासून ते त्यात मांडण्यात आलेल्या ऐतिहासिक प्रसंगांपर्यंत सर्वत ठिकाणी आक्षेपही घेतले गेले. पण, यामध्ये तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाविषयी जाणून घेणाऱ्यांची आणि तितक्याच अभिमानाने त्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्यांची संख्या मात्र वाढली हे नक्की. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ४, फेब्रुवारी... १६७० रोजी आजच्याच दिवशी कोंढाणा अर्थात सिंहगडावर पराक्रमाचा, त्यागाचा आणि निष्ठेचा असा अतुलनीय इतिहास लिहिला गेला. वर्ष १६६५. जून महिना. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांसोबत केलेल्या तहात कोंढाणा किल्ला द्यावा लागला. मात्र १६७० साली कोंढाणा पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यावेळी कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी एक नाव पुढं आलं. ते नाव होतं, तानाजी मालुसरे...


दिनांक ४ फेब्रुवारी १६७०, अष्टमीच्या काळोख्या रात्री अवघ्या शे पाचशे मावळ्यासंह तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. अत्यंत अक्रारविक्राळ आणि उंच असलेला कडा चढून तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी दीड हजारांच्या संख्येत असणाऱ्या मुघल सैन्यासोबत लढा दिला. या लढाईत तानाजी आणि उदयभान आमने सामने आले आणि त्यांच्यात झुंज झाली. यात तानाजींना आपला एक हात ही गमवावा लागला. मात्र तरीही न डगमगता अखेरच्या श्वासापर्यंत या सिंहानं हातावर तलवारीचे वार झेलीत उदयभानला कडवी टक्कर दिली. अखेर या लढाईत तानाजी मालुसरे धारातिर्थी पडले. पण तोपर्यंत सुर्याजी आणि शेलारमामा यांनी मोघल सैन्याचा पाडाव करून कोंढाणा ताब्यत घेतला. मात्र लाडक्या तान्याची खबर ऐकताचच महाराज हळहळले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला.....


कोंढाण्यावरील पराक्रमानंतर या कड्याला 'तानाजी कडा' असं नाव देण्यात आलं. या कड्याचं वैशिष्ठ्य म्हणजे छाती दडपून टाकणारी याची खोली आणि अभेद्य कातळ खडक. 


आज या धाडसी आणि चित्तथरारक मोहिमेला सुमारे साडे तिनशे वर्ष उलटली आहेत. मात्र अवघ्या काही लोकांनाच हा कडा सर करता आलाय. त्यापैकीचं एक म्हणजे तानाजी भोसले. अनेक दिवस अभ्यास करून सराव करून तान्हाजी चा कडा चढले होते. आजच्या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या या सिंहाला नमन करण्यासाठी आणि इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी शिवप्रेमी दरवर्षी सिंहगडावर अवर्जून येतात. नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा आजपर्यंत अनेकांना प्रेरणा देत आलीय आणि यापुढेही कायम प्रेरणा देत राहील.