किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि तत्कालिन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महानगरपालिकेचा नगरविकास विभाग पुन्हा वादात सापडला आहे. देवळालीतल्या एका आरक्षित जागेचा शंभर कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक आजी माजी नगरसेवकांनी केला आहे. देवळालीतील सर्व्हे क्रमांक २९५ मध्ये २० हजार ९० चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आली. याचा टीडीआर घेताना विकासकांनी सर्व्हे क्रमांकाऐवजी दुसऱ्या जागेचा रेडिरेकनरचा इंडेक्स नंबर टाकला. त्यामुळे विकासकांना ६ हजार ५०० ऐवजी २५ हजार १०० रुपयांप्रमाणं मोबदला मिळाला. त्यामुळं विकासकांना २६ कोटी ६६ लाख रुपयांऐवजी १०२ कोटी रुपये मिळाले. 


महापालिकेची ७६ कोटी ३१ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस आणि माजी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर विकासकधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.


झी २४ तासनं याप्रकरणी महापालिका आयुक्तांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे प्रकरण मागील आयुक्तांच्या काळातलं असल्याचं सांगून बोलण्य़ास नकार दिला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानं न्यायालय या प्रकरणात काय आदेश देते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.