विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड : शाळेची पायरी चढल्यानंतर पुढचा प्रत्येक क्षण हा आपल्याला नव्यानं घडवत असतो, संस्कार करत असतो आणि समाजात वावरण्याचा आत्मविश्वास देत असतो. शाळेपासूनच आपली खरी घडण पाहायला मिळते. मोठं झाल्यावर जेव्हा आपण याच शाळेकडे पाहतो तेव्हा डोळ्यासमोरून झरझर सगळी वर्ष निघून जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांच्या आठवणीत शाळा कायम रहावी आणि हे ज्ञानमंदिर अशाच पद्धतीनं ज्ञानार्जनाचं काम करत रहावं यासाठी काही शिक्षकांनी पुझाकार घेत प्रशंसनीय काम केलं आहे.


खरंतर कोरोना काळात शिक्षकांनीही बऱ्याच आव्हानांचा सामना केला. पण, तरीही त्यांनी हा काळही सत्कर्मी लावला. 


कोरोनाच्या काळामध्ये शाळा सुरू नसतानाही पगार मिळाला आहे, मग तो पगार आपण शाळेसाठी खर्च करू या भावनेतून बीड तालुक्यातील काही सच्चे शिक्षक पुढे आले. 


पिंपळादेवीच्या मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर यांनी पुढाकार घेऊन सहशिक्षक असणाऱ्या चौघाजणांचे मतपरिवर्तन केले. त्यांनी स्वखर्चाने शाळेचा चेहरामोहरा बदलला. 


ज्या शाळेकडे फिरकावेही वाटत नव्हते त्या शाळेत विद्यार्थी उत्साहाने येऊ लागले. रूपडं बदललेल्या शाळेत वर्गामधील कार्टुन, अभ्यासाची चित्रे, महापुरूषांचे फोटो कुतुहल निर्माण करणारे होते. 


चार शिक्षकांनी केलेल्या कामाचं कौतुक होत आहे. कुणीतरी पुढे आले पाहिजे, मदतीचा हात देणारे असंख्य तयार होतात. याचाच प्रत्यय पिंपळादेवीच्या शाळेमध्ये आला. या शाळेतील मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर बावीस वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांच्या कार्याची उंची गगनाला गवसणी घालत आहे.