आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : कामावर सुट्टी मंजूर घेण्यासाठी अनेकजण त्यांच्या बॉसला काहीतरी शक्कल किंवा खोटं बोलून सुट्टी मंजूर करून घेतात. असं करणं कित्येकवेळा त्यांच्या अंगलट आलेल्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. मात्र एका दहा वर्षाच्या शाळकरी मुलाने त्याचं स्वत:चं अपहरण करून घेतलं आहे. या घटनेमुळे पोलीस आणि पालकही बुचकळ्यात पडले होते. मात्र हा इतका उद्योग कशासाठी केला असावा?, चंद्रपूर शहरालगतच्या पडोली इथला हा प्रकार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
दहा वर्षाच्या मुलाने शाळेला दांडी मारली होती. मात्र, सुट्टी घेतलेली जर घरी समजलं तर घरच्यांकडून चांगला प्रसाद किंवा ओरडा मिळण्याच्या भीतीने त्याने एक मस्त प्लॅन केला. घरी यायला उशिर का झाला?, पालकांनी विचारलं. मग काय पठ्ठ्याने आपल्याच अपहरणाची खोटी कहानी सांगितली. 


एका माल वाहणाऱ्या ट्रक चालकाने माझं अपहरण केलं होतं. कसा-बसा मी त्याच्या तावडीतून सुटलो आहे. पोलिसांनी ही गोष्ट गंभीर समजत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर आणि चालकाची महामार्ग तपासणी केली. परंतू पोलीस तपास पथकाच्या हाती काहीच सुगावा लागला नाही.


अखेर काही तासांनी पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. घरचे रागवतील या भीतीने त्याने ही स्टोरी सांगितली. लहान वयात त्याच्या डोक्यात ही गोष्ट आली कशी?  यासाठी कारणीभूत आहेत ती आताचे टीव्हीवरील गुन्हे विषयक कार्यक्रम, गेम्स यांचा लहान मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम होतो याचं हे जिवंत उदाहरण आहे.