मयुर निकम, झी २४ तास, बुलडाणा : खवय्यासाठी बुलडाण्यातून एक आनंदाची बातमी आहे. अवघ्या १० रुपयांत तुम्हाला पोटभर अशी कचोरी खाता येणार आहे. शेगावंच्या या कचोरीची चर्चा विदेशातही होते. पश्चिम विदर्भातील श्री संत गजानन महाराजांचे शेगावं म्हणून या संतनगरीची प्रचिती सातासमुद्रापार आहे. याशिवाय विदर्भाची पंढरी म्हणूनही शेगावची ओळख आहे. पण अजूनही एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे शेगावचं नाव आवर्जून घेतलं जातं..!..आणि ती म्हणजे "शेगाव कचोरी". आकाराने छोटीसी पण चव मात्र उत्कृष्ट..लाजवाब. १० रुपयांना ३ नग आणि त्यासोबत मध्यम आकाराची हिरवी मिर्ची...! वाह...एकदम जबरदस्त. एक छोटासा घास आणि त्यासोबत मिर्ची. आणि ही कचोरी एकदा खाल्ली की परत तिची आठवण आलीच समजा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेगांव मोठं तीर्थक्षेत्र असल्याने इथे मध्य रेल्वेच्या सर्वच गाड्यांचा थांबा आहे. मुंबई नागपूर हा रेल्वेमार्ग आहे आणि जेव्हा या मार्गे प्रवासात शेगांव रेल्वेस्टेशन आलं की मग चटोऱ्या मंडळींना ही शेगांव कचोरी घेण्यासाठी दम निघतच नाही. अगोदर कचोरी घरी नेण्यासाठी आपण मोजकेच नग न्यायचो कारण घरी नेईपर्यंत खराब होण्याची शक्यता असायची परंतु आता तीही चिंता मिटली आहे. कारण आता आपल्याला आपल्या घरी तळता येईल अशी कच्ची कचोरी पॅकिंग करून मिळते. 



ही कचोरी जवळपास आठवडाभर तरी खराब होत नाही. विशेष म्हणजे आय. एस. ओ. मानांकन मिळालेली ही शेगांव कचोरीसुद्धा परदेशात निर्यात केली जाते. त्यामुळे आता जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी कच्ची शेगांव कचोरी घरी न्या..तेल गरम करा आणि गरमागरम ताजी शेगांव कचोरी खा..!  


अन खाल्ल्यावर सांगजा बा..कशी लागली ते...!