ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न
Omraje Nimbalkar News : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ओमराजे यांच्यावर मागून डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओमराजे यांनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले.
Omraje Nimbalkar News : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. प्रसंगावधान राखत ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ओमराजेंनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले. रामेश्वर कांबळे असं या डम्पर चालकाचं नाव आहे. बाईकवाल्याला ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचा जबाब चालकाने दिला आहे. या सर्व घटनेमागे घातपात तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा आवाज आला आणि...
धाराशीव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त पसरताच अनेकांनी त्यांच्या चौकशी केली. ओमराजे निंबाळकर गावालगतच ही घटना घडली आहे. ओमराजे गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. व्यायाम करुन घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला. त्यावेळी त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डम्पर अति वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता बाजूला उडी घेतली. त्यामुळे त्यांचा अपघात होतात वाचला.
डम्परचा पाठलाग केला आणि त्याला गाठले...
डम्पर चालक त्याची डावी बाजू सोडून उजव्या बाजूने येत होता. त्यामुळे ओमराजे तात्काळ सावध झालेत. यांनी रस्त्याच्या खाली उडी मारली. डम्पर पुढे निघून गेल्यानंतर ओमराजे यांनी पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलकडे लिफ्ट मागितली आणि त्यानंतर त्यांनी डम्परचा पाठलाग करुन रेल्वे गेट परिसरात त्याला गाठले.
दरम्यान, ओमराजे याची तक्रार ढोकी पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानंतर पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याची पोलीस चौकशी करत आहेत. हा प्रकार चालकाच्या चुकीमुळे झाला? की यामागे काही घातपाताचा हेतू होता का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वीही झाला होता. 2019 मध्ये ओमराजे निंबाळकर खासदार झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पाडोळी येथे चाकू हल्ला झाला होता.