अमोल पेडणेकर, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातून (Thane) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशा करण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून एका रिक्षाचालक (Auto Driver) पतीने आपल्या पत्नीला चालू रिक्षातून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीला रुग्णालयात (Hospital) घेऊन जाण्याऐवजी घरी आणले आणि तिला रॉडच्या सहाय्याने पुन्हा दोन वेळा मारहाण केली. या घटनेत महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण?
ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या कृष्णानंद सिंग उर्फ हॅप्पी या रिक्षाचालकाने फोन करुन आपल्या पत्नीकडे नशा करण्यासाठी पैशाची मागणी केली. महिलेने आपला पगार झाला नसल्याचे पतीला सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या नराधम पतीने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फरफटत बाहेर आणळं. त्यानंतर पत्नीला जबरदस्ती रिक्षात बसवून हायवेला आल्यानंतर तिला चालत्या रिक्षातून ढकलून दिलं. 


चालत्या रिक्षातून खाली पडल्याने महिला गंभीर जखमी झाली. पण निर्दयी पतीला जराही दया आली नाही. त्याने जखमी झालेल्या पत्नीला  रुग्णालयात घेऊन न जाता घरी आणलं आणि पुन्हा लोखंडी सळईच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार 17 डिसेंबर रोजी घडला. 


सासरच्या लोकांना दिली खोटी माहिती
पत्नी जखमी झाल्यानंतर नराधम पतीने पत्नीच्या माहेरी फोन करुन तुमची मुलगी बसमधून पडून जखमी झाल्याचं सांगितलं. यानंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलं. दुसऱ्या दिवशी कृष्णानंद याने आपल्या पत्नीला पुन्हा रुग्णालयातून घरी आणले आणि पुन्हा तिला लोखंडी सळई च्या सहाय्याने बेदम मारहाण केली. पत्नीला वेदना असहाय्य झाल्याने तिने शौचालयाचा बहाणा करून जखमी अवस्थेत पळ काढला आणि आपल्या बहिणीला भेटून संपूर्ण घटना सांगितली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


हे ही वाचा : आताची मोठी बातमी! रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट


पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
बहिणीला हा संपूर्ण प्रकार कळल्यानंतर बहिणीने पीडितेला ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. तिच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत.. नशेसाठी आपल्या बहिणीला तिचा पती लग्न झाल्यापासून म्हणजेच गेल्या 8 वर्षांपासून अशाच प्रकारे मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे पीडितेच्या बहिणीने सांगितलं आहे. सध्या या प्रकरणी ठाण्यातील वागळे पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा जबाब नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस पिडीत महिला आणि तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.