चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, अंबरनाथ : नाशिकमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडूनच दारु पार्टी सुरु असल्याची बातमी काल झी चोवीस तासने उघडकीस आणली होती. त्यानंतर आता अंबरनाथ नगरपालिकेत (Ambernath Nagarpalika) पालिका कर्मचाऱ्यांकडूनच ओली पार्टी सुरु असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील गावदेवी मंदिराशेजारी भव्य अशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची दोन मजली इमारत बांधण्यात आली आहे. लवकरच हे स्पर्धा परीक्षांसाठीचं केंद्र सुरु होणार आहे. सध्या ही इमारत रिकामी असून या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दारुपार्टी होत असल्याचं समोर आलं आहे. 


स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांना ही माहिती कळल्यावर त्यांनी अचानक इमारतीत धाड टाकली. नगरसेवक सुभाष साळुंके जेव्हा या इमारतीत पोहचले त्यावेळेलाही कर्मचाऱ्यांची ओली पार्टी सुरु होती. यावेळी सुभाष साळुंके यांनी ओली पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. तसंच त्या संदर्भातील एक पत्र देखील अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलं आहे. 


पण अद्याप त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाहीये. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून असा गैरप्रकार होत असेल तर टीका कुणावर करायची कशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या संरक्षणासाठी नगरपालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत.


मात्र अशा प्रकारच्या दारू पार्टी या इमारतीत होत असतील तर हे सुरक्षा रक्षक नेमके करतात काय असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.