ठाणे : नाश्ता दिला नाही या क्षुल्ल्क कारणावरुन सासऱ्याने सुनेची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली होती. घटनेत जखमी झालेल्या सीमा पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आरोप सासरा काशिनाथ पाटील फरार होता. ठाण्यातील राबोडी इथं ही घटना घडली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथकं त्याच्या मागावर होती. पण अखेर दोन दिवसांनंतर आरोपी काशिनाथ पाटील स्वत: राबोडी पोलीस ठाण्यात हजर झाला. 


आरोपी दोन दिवस कुठे होता?
सुनेवर गोळी झाडल्यानंतर घटनेवरुन फरार झालेला आरोपी काशिनाथ पाटील ठाण्यातील मुंब्रा आणि कौसा या ठिकाणी फिरत होता, लपण्यासाठी त्याने उभ्या असलेल्या रिक्षाचा आधार घेतला होता. त्याने दोन रात्री रिक्षामध्ये झोपून काढल्या. काही वेळ त्याने ठाणे एसटी बसस्थानकावरही घालवला. त्यानंतर शनिवारी आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती राबोडी, पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.


हत्येच्या एक दिवस आधी काय घडलं?
सुन सीमा पाटील यांच्या हत्येच्या एक दिवस आधीही घरगुती भांडणातून आरोपी काशिनाथ पाटील याने परवाना असलेली रिव्हॉल्व्हर काढत कुटुंबियांना धमकी दिली होती. त्याचवेळी कुटुंबियांनी तक्रार दिली असती तर कारवाई केली असती अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसऱ्याच दिवशी काशिनाथ पाटील याने .३२ बोअर रिव्हॉल्व्हरने सुनेवर गोळी झाडली.


घटनेनंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. यावेळी काशिनाथ पाटीलच्या कपाटात काही जिवंत काडतुसांसह 12 बोअरची बंदूक सापडली ही बंदुकीचा देखील त्याच्याकडे परवाना होता. बांधकाम व्यावसायिक असल्याने त्याने बंदुकीचा परवाना घेतला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. 


नेमकी घटना काय?
काशीनाथ पाटील हा ठाण्यातील राबोडी परिसरात एका उच्चभ्रू इमारतीमध्ये राहतो. त्यांच्यासोबत पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंडेही राहतात. काशीनाथ याचं त्यांच्या दोन्ही सुनांसोबत काही ना काही कारणावरुन खटके उडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा पाटील (42) यांच्यात गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही या कारणावरून घरगुती किरकोळ वाद झाला. याचा राग आल्याने काशीनाथ पाटील याने आपल्या पिस्तूलातून सुनेवर गोळी झाडली. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्या. धक्कादायक म्हणजे ही घटना घडताना घरात त्यांची पत्नी, दुसरी सून, नातवंडं आणि मोलकरीण होती.