ठाणे : राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. माणूस जेव्हा रागात असतो, तेव्हा तो विचारशून्य होतो आणि त्याच्या हातून अघटीत घडू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. क्षुल्ल्क कारणावरुन सासऱ्याने सुनेची गोळी झाडून हत्या केली. काशीनाथ पाटील असं आरोपी सासऱ्याचं नाव असून सुनेची हत्या करुन तो फरार झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
काशीनाथ पाटील हे ठाण्यातील राबोडी परिसरात एका उच्चभ्रू इमारतीमध्ये राहतात. त्यांच्यासोबत पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंडेही राहतात. काशीनाथ यांचं त्यांच्या दोन्ही सुनांसोबत काही ना काही कारणावरुन खटके उडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा पाटील (42) यांच्यात गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही या कारणावरून घरगुती किरकोळ वाद झाला. याचा राग आल्याने काशीनाथ पाटील याने आपल्या पिस्तूलातून सुनेवर गोळीबार केला. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्या. धक्कादायक म्हणजे ही घटना घडताना घरात त्यांची पत्नी, दुसरी सून, नातवंडं आणि मोलकरीण होती.


त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. ज्या पिस्तूलातून गोळी झाडण्यात आली तिचा रितसर परवाना आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


काशीनाथ सध्या फरार असून, हत्यामध्ये वापरण्यात आलेलं पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं असून, पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन स्पेशल पथक रवाना केलीत.