कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा आता तोंडावर आली असून सर्वाधिक सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. पण त्याआधीच मनसे विरुद्ध IPL असा सामना रंगला आहे. मुंबईतील बसचं कंत्राट परराज्यातील वाहतूकदारांना दिल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी बसच्या काचा फोडल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता दुसरी ठिणगी ठाण्यात पडली आहे. IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सराव करणार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रंगरंगोटीचं काम हाती घेण्यात आलं आहे. पण त्यासोबतच रस्त्यात येणाऱ्या काही झाडांच्या मोठाल्या फांद्या देखील तोडण्यात येत आहेत. 


याबाबत मनसेच्या वाहतूक सेनेचे ठाणे अध्यक्ष आशिष डोके यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका असून ठाण्यातील पारा 43 डिग्री च्या पार झाल्याने नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. अशात वृक्षतोड करणं अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं सांगत मनसेने विरोध केला आहे.


IPL दरम्यान परराज्यातील बसेस ठाण्यात आल्या तर त्याविरोधात देखील मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल असा सज्जड दम देखील त्यांनी दिला आहे.