Thane Chowpatty: चौपाटी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गिरगाव व दादरची चौपाटी. समुद्र आणि चौपाटीवर बसून पाहिलेला सूर्यास्त हे चित्र कित्येक मुंबईकरांनी डोळ्यात साठवलं असेल. पण मुंबईतील चौपाटींवर विकेंडला मोठी गर्दी उसळते. लहान मुलांना फिरायला घेऊन येणारी जोडपी तर कधी विकेंडला मित्र-मैत्रीणींसोबत वेळ घालवणारी कॉलेजची मुलं. मात्र, हल्ली चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ठाणेकरांना वेगळी वाट काढून मुंबईला यावं लागतं. मात्र, आता ठाणेकरांना हक्काची चौपाटी मिळणार आहे. पारसिक-मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं पावसाळ्यानंतर या चौपाटीचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारसिक-मुंब्रा येथील बहुप्रतिक्षित रेतीबंदर चौपाटी प्रकल्प 2009पासून प्रस्तावित आहे. रेतीबंदर खाडीच्या 4 किमी लांबीच्या बाजूने 42 एकरांवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर ही चौपाटी उभारण्यात येत आहे. थीम पार्क, बोटिंग, अॅम्फी थिएटर, बोटींग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने त्याचबरोबर 18 अत्याधुनिक सुविधा या रेतीबंदर चौपाटीवर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं ठाणेकरांसाठी विरंगुळ्याचे आणखी एक साधन निर्माण होणार आहे. 


मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात असून ठाणेकरांना नवीन विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे. पुढील तीन महिन्यात म्हणजेच पावसाळ्यानंतर या चौपाटीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे लोकार्पण होणार आहे. पावसाळ्यानंतर ठाणेकर आता या नवीन चौपाटीवर थोडे निवांतक्षण अनुभवता येणार आहे. 


गायमुख चौपाटी


ठाण्यात याआधीही गायमुख चौपाटी उभारण्यात आली होती. ठाण्यातील खाडी किनारे निसर्गसंपन्न आहेत. त्यामुळं या किनाऱ्यांवर वॉटरफ्रंड डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी खाडी किनाऱ्यावर पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रय़त्न सुरू आहे. त्याच प्रकल्पाचा एक भाग म्हणजे गायमुख चौपाटी. 2019 मध्ये गायमुख चौपाटीचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले होते. या चौपाटीवरही ठाणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्याचबरोबर ठाणेकरांना आता आणखी एका चौपाटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.