कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : चोरी किंवा आपल्यावरील अन्यायाची तक्रार करण्यासाठी आपण पोलीस स्टेशन गाठतो. पोलीस आपली समस्या सोडवतील हा विश्वास आपल्याला असतो. पण पोलीसच चोर निघाले तर दाद तरी कोणाकडे मागणार. अशीच काहीशी घटना ठाण्यातील मुंब्रा इथं उघडकीस आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकून मुंब्रा इथल्या चार पोलिसांवर 6 कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह चार पोलिसांवर एका व्यापाऱ्याला 6 कोटी रुपयांना लुटल्याचा आरोप आहे. 


ठाणे पोलिस आयुक्तांनी या आरोपाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना पाठवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फैजल मेमन या व्यावसायिकाकडून 30 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


हा आपल्या कष्टाचा पैसा असल्याचा दावा करत व्यावसायिकाने पैसे परत करण्याची विनंती केली. यानंतर पोलिसांनी व्यावसायिकाला 24 कोटी रुपये परत केले, तर 6 कोटी रुपये स्वत:कडे ठेवले. याप्रकरणी व्यावसायिकाने तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी आणि 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच सर्व निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.