ठाणे : महानगर पालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. ठाण्यात सक्रीय असलेल्या टँकर लॉबीमुळेच धरणाचा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावत नाहीत. पाणी सोडणारे व्हॉल्व ऑपरेटर हे पाण्याचे दलाल आहेत. ते पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ठाणे शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यात सध्या सत्तेवर असलेल्या पक्षाचे राजकीय पुढारी पाण्याचा खेळ खेळत आहेत. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला असून दिवा, मुंब्रा, कळवा, नौपाडा, वागळे, घोडबंदर आदी सर्वच भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. २५ वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधार्‍यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकर लॉबी कामाला लागलेली आहे. हे टँकर कोणाचे आहेत, याची चौकशी करण्यात आली पाहिजे, असे मागणी आव्हाड यांनी केली.


सध्या ज्या धरणांचे पाणी ठाणेकरांना मिळत आहे. त्या धरणांममध्ये १८ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जर, ठाणे पालिकेचे स्वत:च्या मालकीचे धरण असते तर ही वेळच आली नसती. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची दैनंदिनी चालत आहे. त्यातून त्यांच्या नेत्याला हप्ते मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नाही. म्हणूनच ज्या आयुक्तांनी ठाणे शहरात अनेक सुंदर कामे केली आहेत. त्या आयुक्तांनीच आता पुढाकार घेऊन मेट्रो- अंतर्गत मेट्रो असे हजारो कोटींचे प्रकल्प एक-दोन वर्षांसाठी बाजूला सारुन पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे ते म्हणालेत.



यापुढे ठामपाच्या मालकीच्या धरणाचे काय झाले, याचा जाब सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला पाहिजे. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक येत्या महासभेत धरणाचे काय झाले, हे विचारणार असून जर अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही जितेंद्र  आव्हाड यांनी दिला आहे.