आता फिरा मस्त बिंधास्त! लोणावळा, मावळधील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली
पर्यटन स्थळी असलेले प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध केला जाणार नाही.
Lonavala Tourist Places : लोणावळ्यात पावसाळी पिकनिकचा बेत आखणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्यात आली आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळ धोकादायक बनल्यामुळे येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता पर्यटक येथे वर्षा सहलींचा आनंद लुटू शकतात.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर 25 जुलै पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने आज 27 जुलै रोजी रात्री बारानंतर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारी पर्यटकांना पर्यटन स्थळांवर जाण्याकरता कोणत्याही प्रतिबंध नसणार आहे.
लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये अति मुसळधार पाऊस मागील आठवड्यात सुरू होता. या पावसामुळे सर्व परिसर जलमय होऊन सर्व धबधबे व धरणांच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान लोणावळा व मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतचा प्रतिबंधात्मक आदेश मावळ मुळशीचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी काढला होता.
मात्र शुक्रवार 26 जुलै पासून लोणावळा व मावळ तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. धरण व धबधबे परिसरातून वाहणारे पाणी हे देखील कमी झाले असल्याने, सदरचा प्रतिबंधात्मक आदेश आज 27 जुलै रोजी रात्री बारापासून शिथिल करण्यात आला असल्याचे सुधारित पत्रक मावळ मुळशीचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी काढले आहे. या आदेशामुळे पर्यटन स्थळांवरील लहान मोठे व्यवसायिक टुरिस्ट व रिक्षा व्यवसायिक तसेच लोणावळा व मावळ परिसरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी येणारे पर्यटक या सर्वांना दिलासा मिळणार आहे.
मावळमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं इंद्रायणी आणि पवना नदी दुथडी भरून वाहतायेत. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 29 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आलीये.. पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटक सर्व आदेश झुगारून वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात येतायेत.