बिल्डर डीएसके यांना दिल्लीतून पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांत दाखल करण्यात आलेत.
पुण्यात आणणार
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरु केल्या होत्या. पुणे पोलीस डीएसकेंच्या मागावर असून त्यांच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आलीत. मात्र, डीएसके आहेत तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आज पहाटे नवी दिल्लीतून डी. एस. कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. त्यांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात आले होते. कालच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंना खडेबोल सुनावले होते. तसंच डीएसकेंमुळे न्यायालयावर गुंतवणूकदारांची माफी मागण्याची वेळ आली. दिरंगाई झाल्यामुळे माफी मागत असल्याचं न्यायालयानं गुंतवणूकदारांना सांगितले.
तसंच डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत. त्याचबरोबर बुलडाणा अर्बन बॅंकेलाही कोर्टाने फटकारले आहे.
खोटारडेपणा उघड
डिएसके यांची संपत्ती विकत घेऊन त्यांना १०० कोटी रुपये देण्याची तयारी बुलडाणा अर्बन बँकेनं दाखवली होती. पण मुळात जी संपत्ती डीएसके यांनी बुलडाणा अर्बन बॅंकेला सादर केली होती. ती सगळी संपत्ती आधीच महाराष्ट्र बॅंकेकडे गहाण होती. या प्रकरणाची पुढची सुनावणी १ मार्चला होणार आहे.