मयूर निकम, झी मीडिया : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात (Women Harrasement) कायद्यात कडक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकराणात दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालय कठोर शिक्षा सुनावते. मात्र, या कायदाचा गैर वापर करण्याचा प्रयत्न करत न्यायालयात साक्ष फिरवणाऱ्या बलात्कार पीडितेवर कारवाई करण्यात आली आहे (crime news ). कोर्टाने या महिलेला तुरुंगात धाडले आहे. बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्कार पीडित फिर्यादी महिलेने न्यायालयात सुनावणी दरम्यान मूळ साक्ष फिरवल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. तर,  फितूर होऊन खोटी साक्ष दिल्याने पीडित फिर्यादी महिलेला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन महिन्यांचा कारावास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कदाचित ही पहिलीच घटना आहे.


चिखली तालुक्यातील एका 27 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या पतीच्या मित्राने तीच्यावर बलात्कार केल्याची तक्रार अमडापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलीसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून न्यायदंडाधिकारी  यांच्यासमोर पीडित फिर्यादी महिलेचा जवाब नोंदविला होता. 


तसेच प्रकरणाचा तपास करून अन्य साक्षीपुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन.मेहेरे यांच्या न्यायालयात सुनावणी दरम्यान बलात्कार पीडित फिर्यादी महिलेने आपली साक्ष फिरवली व आरोपीने कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगीतले. फिर्यादी महिला फितूर झाल्यामुळे बलात्काराच्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.  


पीडित फिर्यादी महिलेने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे दिसत असल्यामुळे  पीडित महिलेवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 344 नुसार कारवाई करण्याबाबतचे मत नोंदवले. विशेष म्हणजे या प्रकरणात त्या अनुषंगाने न्यायाधीश मेहेरे यांनी स्वतः पीडित फिर्यादी महिलेविरूद्ध त्यांच्याच न्यायालयात ई-फायलिंगच्या माध्यमातून किरकोळ फौजदारी अर्ज दाखल केला.


अशा प्रकारच्या गुन्ह्यात ई-फायलिंगद्वारे दाखल झालेले या न्यायालयातील हे पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणात ‘त्या’ महिलेला तीचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने 15 दिवसांचा अवधी दिला होता. 20 फेब्रूवारी रोजी यावर सुनावली झाली. विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी, पीडित फिर्यादी महिलेने तक्रार देऊन यंत्रणेस कामास लावले व न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे तीला शिक्षा देण्याची मागणी केली. यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.मेहेरे यांच्या न्यायालयाने पीडित फिर्यादी महिलेस दोन महिन्यांचा साधा कारावास व पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.