प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही काही संशयित आढळल्यानं घबराट निर्माण झालीयं. केरळमध्ये काही संशयित रुग्ण आढळलेत. त्यामुळे केरळलगत असलेल्या कोकणातल्या बंदरांत येणाऱ्या बोटींवर आरोग्य खात्यातर्फे खास तपासणी यंत्रणा राबवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या जगाने कोरोनो व्हायरसचा धसका घेतला आहे. भारतात पहिला संशयित केरळमध्ये आढळलाय. त्यामुळे कोरोना केरळलगत असलेल्या कोकणात कधीही प्रवेश करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीनं आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाने बंदर विभागाला निदान, उपचार व्यवस्थेबाबत सूचना केल्यात. तर जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.


 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक बंदरे आहेत. या बंदरात देश विदेशातून बोटी येतात. त्यामुळे या बोटींद्वारे येणाऱ्या प्रवाशांद्वारा कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जातेय. बंदरात येणाऱ्या बोटींची तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. दुसरीकडे कोकण रेल्वेच्या बहुतांश गाड्या केरळहून येतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांवरही खास नजर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकूणच कोकणात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी पुढचे काही दिवस आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांना अधिक सतर्क रहावं लागणारे.