उस्मानाबाद : अन्यायकारक निकष लावत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करत आहेत. मात्र, या पीक विमा कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच चाप लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी पीक विम्याची थकीत रक्कम मिळावी यासाठी शेतकरी पीक विमा कंपन्यांचा उंबरठा झिजवत असतात. मात्र, या शेतकऱ्यांवर जाचक अटी लादून त्यांना पीक विमा रक्कम नाकारली जाते. याविरोधात भाजप आमदार राणा जगजितसिग पाटील यांनी दंड थोपटले आहेत.


पीक विमा कंपनी विरोधात एक याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने  उस्मानबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५०० कोटी पीक विमा रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.


खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात आता पीक विमा कंपनी वरिष्ठ कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. यामुळे याचिकाकर्त्यांच्यावतीने भाजप आमदार राणा जगजितसिग पाटील कोर्टात कॅव्हेट दाखल करणार आहेत.


या कॅव्हेटमुळे जरी पीक विमा कंपनीने वरिष्ठ न्यायालयात जाऊन स्थगिती घ्यायचे ठरविले तरी याचिकाकर्त्याच्या कॅव्हेटमुळे थेट हस्तक्षेप करता येणार नाही. या संदर्भात बोलताना शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी संपूर्ण राज्यात पीक विमा कंपनीविरोधात केस दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.