प्रताप नाईक / कोल्हापूर : Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. (Rain in Kolhapur )तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत असल्याने येथेही पुराचा धोका वाढला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अखेर लष्कराला पाचारण करावे लागले आहे. लष्काराचे 65 जवानांचे एक यूनिट कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. आधीच एनडीआरएफच्या पथकाकडून मदत करण्यात येत आहे. मात्र, पुराचा वेढा कायम असल्याने लष्कराची मदत घ्यावी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या चिखली आणि आंबेवाडीत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. NDRF च्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. कोल्हापुरात महापुरानं वेढा घातल्याने अनेक नागरिक संकटात अडकले आहेत. त्यांचे आता स्थलांतर केलं जात आहे. 



कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पाण्यात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तीन ते चार फूट पाणी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील पाण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने 2019 च्या भयानक महापुराचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेढले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 56 फूट 1 इंचावर जाऊन पोहोचली आहे.


दरम्यान, कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर असताना रंकाळ्यावर काही तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. महापूराचा धोका असताना डान्स करत तरुणांनी अशोभनीय कृत्य केले आहे. संकटात अडकलेल्यांना सुखरुप स्थळी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना दुसरीकडे अशी हुल्लडबाजी करणं योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.



सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली


सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी धोका पातळीवर असून अनेक उपनगरांत पाणी साचले आहे. जिल्ह्यातली 86 गावं पुरानं वेढली. सांगली-कोल्हापूर संपर्क तुटला आहे. सांगलीच्या शिराळ तालुक्यातील आरळामध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. सांगली महापालिकेचे आयुक्त नितीनकुमार कापडणीस यांच्या निवासस्थानाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. आयुक्तांच्या बंगल्यात पाणी शिरले आहे. सांगली शहरात पुरामुळे तब्बल 36 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 7 हजार 671 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यात 14 हजार 800 जनावरांचं स्थलांतर करण्यात आले



तर साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये डोंगराचा कडा कोसळून दुर्घटनेत पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून 16 जण अडकल्याची भीती  आहे. अजुनही शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्य अद्याप सुरु आहे. एनडीआरएफचे जवान येथे मदत करत आहेत. 


सिंधुदुर्गात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बांदा, दोडामार्ग, कुडाळमध्ये संपूर्ण बाजार पेठ जलमय झाल्या आहेत.