नागपूर - डॉ़क्टरकडे खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक करण्यात अंबाझरी ठाण्यातील पोलिसांना यश आले. ही घटना नागपूर येथे घडली. आरोपींनी डॉ. सपना यांना पत्र पाठवले होते आणि त्या पत्रामधूनच आरोपींनी पैशांची मागणी केली होती. तसेच तुमच्या कुंटूबातील प्रत्येक सदस्यांना चांगल्या प्रकारे ओळखत असल्याचेही सांगितले होते. पैसे न दिल्यास पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू, अशी धमकीही आरोपींनी पत्रातून केली. महत्वाची म्हणजे या घटनेतील दोन आरोपींवर आधी बऱ्याच गुन्ह्यांची नोंद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष चौधरी आणि त्यांची पत्नी सपना हे दोघेही डॉक्टर आहेत. तसेच त्यांना दोन मुलेही आहेत. गांधीनगर येथे आशिष यांचे खासगी रुग्णालय आहे. तसेच सपना या वर्धा रोड येथे खासगी पॅथोलॉजी लॅबमध्ये कार्यरत आहेत. ८ फेब्रुवारीला सपना यांना त्यांच्या पत्त्यावर पत्र आले. त्या पत्रात ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच आम्हाला पैसे मिळाले नाही, तर त्याचे परिणाम वाईट होतील. तसेच कुटूंबातील प्रत्येक सदस्यांची त्यांच्याकडे संपूर्ण माहिती असल्याचे त्यांनी त्या पत्रात नमूद केले. आरोपींनी सपना यांना फोन वरुनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सपना यांनी त्यांच्या फोनला उत्तर दिले नाही. या घटनेची संपूर्ण माहिती सपना यांनी त्यांचे पती आशिष यांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. 


आरोपींनी सपना यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क केल्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले. पोलिसांनी आरोपींच्या फोनचे स्थान शोधून आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना ताबडतोब अटक केली. राधेश्याम सरकार, मोसीन खान, वहीद, फिरोज खान असे या आरोपींचे नावे आहेत. सरकार हा आशिष यांच्या क्लिनीकवर काम करीत होता. फिरोज हा मोसीनचा मोठा भाऊ आहे. तसेच या दोघांवर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.