शासनाने एसटीची थकबाकी देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, इंटकची मागणी
महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाचे २६८.९६ कोटी रूपयांची रक्कम तात्काळ द्यावे
मुंबई : महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाचे २६८.९६ कोटी रूपयांची रक्कम तात्काळ देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केलीय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने परराज्यातील मजुरांना परराज्याच्या सीमेवर पोहचविले. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. यासाठी शासनातर्फे सर्व खर्च देण्यात येणार होता. परंतु मजुरांनाच्या मोफत प्रवासाचे पैसे मदत व पुर्नवसन खात्याकडून ९४ कोटी ९६ लाख इतकी रक्कम एस.टी. महामंडळास येणी आहे. तसेच पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणूक याकरीता एस.टी. बसच्या खर्चापोटी शासनाकडून १४७ कोटी रुपयांची येणी आहे. याशिवाय विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी २७ कोटी रूपये येणे असल्याचे इंटकतर्फे सांगण्यात आले.
कोरोना काळात एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असुन लॉकडाऊनच्या काळात २५०० कोटीहुन अधिक नुकसान झालंय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही रक्कम उपलब्ध नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वेतनासाठी ५०० कोटी रुपये अर्थसहाय्य दयावे. तसेच मजुर प्रवास, पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणूक, विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी परतावा असे एकूण २६८.९६ कोटी तात्काळ एस.टी. महामंडळास दयावेत अशी मागणी करण्यात आलीयं.
एस.टी. महामंडळाने कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन ५० टक्के देऊन १०० टक्के कपाती केल्याने निव्वळ वेतन अत्यंत कमी आलय. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलीय. तसेच जुन महिन्याचे वेतनही अद्याप देण्यात आले नसल्याचे मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
एसटी महामंडळाला १००० कोटी रुपयांचे अनुदान देऊन आर्थिकदृष्टया सक्षम करावे अशी मागणी जयप्रकाश छाजेड यांनी केलीयं.