पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Maharashtra Rain Update: मागील 15 दिवसांपासून महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट देखील देण्यात आला होता. पावसासंदर्भात महत्त्वाची मात्र जरा वेगळी अपडेट समोर आली आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पाऊस थोडी विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढचे 3-४ दिवस राज्यात पावसात घट होणार आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात कोसळणारा पाऊस जरा विश्रांती घेणार आहे. मात्र, 2 ऑगस्टच्या आसपास राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. अनेकजण पावसाळी पिकनिकचा बेत आखत आहेत. सध्या मात्र, पाऊस विश्रांती घेणार असल्यामुळे धबधबे तसेच पर्यटनस्थळांवरील गर्दी कमी होवू शकते.
पावसाने विश्रांती घेतली तरी रस्ते पाण्याखाली
वसई विरार मध्ये गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी मात्र सखल रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे-तुळींज रस्ता अद्याप पाण्याखाली आहे. या पाण्यात अनेकांची वाहने बंद पडत आहेत. रस्त्यात मोठे मोठे खड्डे झाल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही, त्याचसोबत काही गटारांची झाकणे उघडी असल्याने नागरिकांना या मार्गांवरून चाचपडतच जावं लागत आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडले
नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेनं जात असून, गोदावरी नदीमध्ये 16 हजार 355 क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस होत आहे. तर दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नांदूरमधमेश्वर धरणाचा पाणीसाठा वाढू लागलाय. त्यामुळे गोदावरी नदी पात्रातून पाणी सोडण्यात आलंय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात ढगफुटीसदृश पाऊस
पश्चिम विदर्भात आठवडाभरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात तब्बल 37 तालुक्यांसह 190 महसूल मंडळांमध्ये हाहाकार उडाला. आपत्तीमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. पुराचं पाणी शेतीमध्ये शिरल्याने 6 लाख हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूरसह शेतीचं नुकसान झाले आहे. तसंच पाच जिल्ह्यातील 72 रस्ते आणि नदी नाल्यांवरील 118 पुलांचंही नुकसान झाले आहे.