मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील अशी योजना महाविकास आघाडी सरकार आणणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची झी २४ तासला दिली. दुध दराबाबतची बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरानाच्या स्थितीतही ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक जगला पाहिजे अशी आमची भूमिका आहे .महाविकास आघाडी सरकार लवकरच यासाठी नवी योजना घेऊन येईल असे ते म्हणाले. मागच्या सरकारमध्ये जाहीर केलेलं अनुदान अद्याप मिळालेलं नाही. मात्र यावेळी तसं होणार नाही, महाविकास आघाडी यासाठी चांगली योजना आणणार आहे. 


तुमच्या आर्थिक परिस्थितीला धक्का लागणार नाही, असे मी राज्यातील दूध उत्पादकांना सांगू इच्छितो, त्यासाठी लवकरच योजना आणू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी यासाठी लवकरच चर्चा करणार असल्याचे दुग्धमंत्र्यांनी स्पष्ट केले. 



निर्णय घेण्याचे अधिकार दुग्धमंत्री यांना कितीपत होते याबद्दल शंका व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेवू असं सांगितलं. परंतु शासन निर्णय घेणार नाही, राज्यसरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


दुग्ध विकास मंत्री सुनिल केदारी यांच्याशी झालेल्या बैठकीबाबत राजू शेट्टी असमाधानी दिसले. दुधपावडर तयार करणारयाला अनुदान नको, शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळावे अशी भूमिका त्यांनी मांडली. शिल्लक दूधपावडरबाबत केंद्राशी बोलून पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.


सदाभाऊ खोत देखील यावेळी आक्रमक पाहायला मिळाले. शेतकरी अडचणीत आले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही तोपर्यंत महायुती आंदोलन मागे घेणार नाही. राज्य सरकारने दूध उत्पादन विक्रेत्यांना वाढीव १० रुपये कमीत कमी अनुदान द्यावे ही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच दोन दिवसात भूमिका ठरवू असेही स्पष्ट केले.