गणपतीमध्ये पुणेकरांचा आवाज वाढला, `या` चौकांमध्ये झालं सर्वाधिक ध्वनिप्रदूषण!
पुण्यातील मंडळांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची आकडेवारी समोर आली आहे.
Pune News : कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या थाटा माटात गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं होतं. काल बाप्पाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीमध्ये राज्यभर गणपतीच्या नावाचा जयघोष चालू होता. सकाळपासून चालू झालेल्या मिरवणूका आज सकाळपर्यंत संपताना दिसल्या. 12 तासांपेक्षा चाललेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषणा झालं. पुण्यातील मंडळांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची आकडेवारी समोर आली आहे.
शहरातील सर्व प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर आवाजाची सरासरी दुप्पटीपेक्षा जास्त नोंदवली गेली. मिरवणुकीत सर्वाधिक आवाजाची सरासरी 105.2 डेसीबल इतकी राहिली. पुण्यात आज सकाळी 8 वाजता खंडोजी बाबा चौकात 128.5 डेसीबल इतकी ध्वनिप्रदूषणाची पातळी होती. ही अतिधोकादायक पातळी आहे.
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिरीगच्या टीमने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार प्रमुख चौकातील ध्वनिप्रदूषणची सरासरी पातळी याप्रमाणे बेलबाग चौक -102.8 डेसीबल, गणपती चौक-104.9 डेसीबल, कुमठे चौक-113.1 डेसीबल, टिळक चौक -105.3 डेसीबल आणि खंडोजी बाबा चौक-102.2 डेसीबल.
पुण्यात तब्बल 29 तास मिरवणूक चालली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. ज्या मंडळांनी ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडली त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अमिताभ गुप्ता यांनी दिला.