जगातील एकमेव शिवमंदिर जिथे महादेवासमोर नंदीच नाही, काय आहे कारण?
दरम्यान आज आम्ही तुम्हाला जगातील एकमेव शिवमंदिरांबाबत माहिती सांगणार आहोत, ज्या शिवमंदिरात नंदी नाही.
नाशिक : शिवभक्तांसाठी श्रावण महिना (Shravan Month)अतिशय महत्त्वाचा आहे. श्रावणात प्रत्येक शिवभक्त शिवशंकराची आराधना करत (Shravan Pooja) असतो. श्रावणी सोमवारी शिवशंकराची पूजा केल्यास भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, दुःख- दारिद्रय दूर होतं, प्रगतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला जगातील एकमेव शिवमंदिरांबाबत माहिती सांगणार आहोत, ज्या शिवमंदिरात नंदी नाही. नाशिकमधील पंचवटी परिसरात कपालेश्वराचे मंदिर (Kapaleshwar Temple Nashik) आहे. मंदिरातील पिंडीसमोर नंदी नाही. यामागे मोठी आख्यायिका आहे.
नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर कपालेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर आहे. शिवशंकराने या ठिकाणी काही काळ वास्तव्य केलं होतं, असा उल्लेख येथे आढळतो. शिवपुराणात म्हटल्याप्रमाणे, नंदी नसलेलं हे जगातील एकमेव शिवमंदिर आहे.
काय आहे यामागील कहाणी?
भोळा शंकर म्हणजे महादेव. महादेवाला देवांचा देव मानलं जातं. महादेवाचे मंदिर नाही, असं भारतात एकही गाव शोधून सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशंकराची आराधना केली जाते. नंदी हे महादेवाचं वाहन आहे. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात तुम्ही पाहिला असेल, पण नाशिकच्या कपालेश्वर मंदिराचं एक विशेष आहे. या मंदिरात शंकराच्या पिंडीसमोर नंदी दिसत नाही.
असं म्हणतात महादेवाला ब्रह्महत्येचे पातक लागलं होतं. या पातकापासून स्वःताची सुटका करून घेण्यासाठी महादेवाने अक्षरशः त्रिभुवन पालथं घातलं होतं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होत नव्हतं. त्यामुळे महादेव अस्वस्थ झाले होते. अशा अवस्थेत नंदीने महादेवाला पाहिलं. त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. महादेवाने रामकुंडावरील गोदावरी आणि अरुणा नदीच्या संगमात स्नान केला. त्यानंतर त्यांच्यावरील ब्रह्महत्येचं पातक दूर झालं.
नंदीमुळेच आपली ब्रह्महत्येच्या पातकातून सुटका झाली, त्यामुळे नंदी आपला गुरू आहे, असे उद्गार महादेवाने याठिकाणी काढले होते. नंदीला आपल्या समोर बसण्यास नकार दिल्याचा पुरानात उल्लेख आहे. कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाने बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं, असा देखील पौराणिक संदर्भ सापडतो.