रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता
रायगड : रायगड किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता आहे. आज शाळांच्या सुट्टीचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे रायगडमधले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत.
कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवरच वादळी वारे वाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने समुद्रावर येणाऱ्या लाटादेखील अधिक उंचीच्या असणार आहेत. चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शाळा सुरु होण्यापूर्वी शेवटचे सुट्टीचे दिवस आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने रायगडच्या किनारपट्टीवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळेच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळात पाऊस दाखल झाला असून येत्या दोन दिवसांत कोकणातही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळ राहण्याऱ्या नागरिकांना तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यातील किनारपट्टीवर आलेल्या पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.