कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : आळंदीमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलाला संस्था चालकाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या मारहणीनंतर ११ वर्षांचा चिमुरडा ५ दिवस कोमात होता. या घटनेनंतर संस्था चालक भगवान महाराज पोव्हणे फरार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळंदीच्या श्री माऊली ज्ञानराज कृपाप्रसाद आध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारा हा मुलगा सध्या रुग्णालयात विव्हळत पडलाय. केवळ हरिपाठ आला नाही म्हणून त्याला संस्था चालक भगवान महाराज पोव्हणे यांनी काठीच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की मुलगा बेशुद्ध पडला. त्यानंतर संस्था चालकाने मुलाच्या आई वडिलांना फोन करून मुलगा आजारी असल्याचं सांगितलं. 


आई वडिलांनी तातडीने त्याला तळेगाव दाभाडेच्या रुग्णालयात दाखल केलं. पाच ते सहा दिवसानंतर मुलाला शुद्ध आली आणि त्याने घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर भगवान महाराज पोव्हाणे याच्या विरोधात आळंदी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता जखमी मुलावर पिंपरीच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


महाराजाविरोधात मुलाच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर महाराज फरार आहे. आळंदी पोलिसांचं एक पथक फरार असलेल्या महाराजांचा शोध घेत आहेत. 


स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या, समाजप्रबोधनासाठी किर्तन सांगणाऱ्या शिक्षकाकडून अशा पध्दतीची वर्तवणूक होणं ही निंदनीय बाब आहे.