ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेल्या नळांची चोरी
प्रसाधनगृहांमधील नळही चोरांनी सोडले नाहीत...
मुंबई : अनेकदा प्रवासी ट्रेनमध्ये (Trains) कोणत्याही सुविधा नसल्याने त्रस्त असतात. कधी प्रसाधनगृहात नळ नसल्याने तर कधी पंखा काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत असतात. पण आता ट्रेनमधील एका प्रकारानंतर प्रवाशांनाही जबाबदार ठरवायचं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं उदाहरण गदग एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पाहण्यात आलं.
उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत रेल्वेने या दोन्ही ट्रेनमध्ये चांगल्या प्रतीचे नळ आणि काही इतर सामान लावलं होतं. पण चोरांनी नळ आणि अन्य सामानासह तीन लाख रुपयांच्या सामानाची चोरी केली आहे. यात फिटिंग्सचा खर्च मिळवल्यास या रकमेचा आकडा ५ लाख रुपयांपर्यंत पोहचतो.
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
- ट्रेनमध्ये लावलेल्या ६० फ्लश व्हॉल पैकी २० व्हॉलची चोरी
- ६० पैकी २० health faucet चोरी
- १२० पैकी ५१ नळ चोरी
सीएसएमटीहून गदगला जाणाऱ्या गदग एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार घडला
- ४० पैकी २७ फ्लशर व्हॉल चोरी
- ४० पैका १६ health faucet चोरी
- ८० पैकी २७ नळ चोरी
दोन्ही मिळून जवळपास १६९ फिटिंग्सची चोरी झाली आहे. रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी, उत्तम प्रतीचं सामान लावलं होतं. पण आता प्रसाधनगृहात अशाप्रकारे झालेल्या चोरीनंतर प्रवाशांच्या वागणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ट्रेन ज्यावेळी शेवटच्या स्थानकांत खाली होते, त्यावेळी ही चोरी होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण सामान नेमकं कुठे चोरी करण्यात येतं याबाबत रेल्वेकडून तपास सुरु आहे.