कल्याण मधील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा पळवली
दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याणमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
Kalyan Crime News : कल्याणमधील आग्रा रोडवरील प्रसिद्ध दक्षिणमुखी मारुती मंदिरात चोरी झाली आहे. चांदीची गदा, हार आणि छत्रासह दानपेटीतील रोकड चोरीला गेली आहे. चोरानं मंदिरातील वायफायचं राऊटर, सीसीटीव्ही कॅमे-यासह, DVRही चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केलाय.
काय आहे नेमका प्रकार?
सोमवारी रात्रीच्या सुमारास पुजारी मंदिर बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाचा टाळा तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सव्वा किलोची चांदीची गदा, चांदीचा हार, चांदीचे छत्र, चांदीचा मुकुट यासह दानपेटीतील रोकड देखील चोरून नेली. पकडले जाऊ नये म्हणून या चोरट्याने मंदिरातील वायफायचे राऊटर, सीसीटीव्ही कॅमेरासह डीव्हीआर देखील चोरून नेलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कल्याण बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
भरदिवसा चोरांनी 14 लाख रुपये असलेली बॅग पळवली
जालना औद्योगिक वसाहतीतील ओम साई राम स्टील कंपनी जवळ भरदिवसा चोरांनी 14 लाख रुपये असलेली बॅग पळवली होती. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात 2 अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट देत MIDC परिसरात गस्त वाढवायच्या सूचना दिल्या.
इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक
इंदापुरच्या भिगवण पोलिसांनी शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी, पाण्याचे इंजिन आणि दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीसांंनी चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. यासोबतच 3 लाख 40 हजार रुपये किमतीचे चोरीला गेलेले दहा मोबाईल देखील पोलिसांनी परत मिळवले आहेत. विश्वजीत उर्फ सुंदर तुकाराम ढवळे, रोहन उर्फ सखाराम डोंबाळे, नितीन सखाराम हरीहर व सलीम मेहबुब शेख यांना अटक केलिओ असून हे सर्वजन इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावचे रहीवाशी आहेत. भिगवण पोलिसांनी आरोपींकडून शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या 19 इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी, 1 पाण्याचे इंजिन, 3 मोटार सायकली, 1 फ्रिज, 1 एल. सी. डी. टीव्ही असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यासोबत हरवलेले 10 मोबाईल देखील पोलीसांनी परत मिळवले आहेत.