मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजीपार्क येथे संपन्न झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे म्हणाले, साडे सहा वाजल्यापासून मी तयार होतो. अनेकांचे फोन येत होते. गर्दी आहे. थोड्या वेळाने निघा. त्यामुळे यायला उशीर झाला. आज मनसैनिकांचे दर्शन घेताना अभिमान वाटतोय. तीन वर्षांपूर्वी येथे मेळावा झाला होता. त्यानंतर दोन वर्ष  मेळावा घेता आला नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे. तो काळ आठवला की कधी बरं वाटतं तर कधी भीती वाटते.


शिवाजी पार्कात एक माणूस दिसत नव्हता. पण, पोलिसांचा दांडिया सुरु होता. त्यांचाही नाईलाज होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना खास धन्यवाद. २४ तास दिवसरात्र झटत होते. गेल्या दोन वर्षानंतर इतकं तुंबलंय. मोरी साचलीय. बोळा घालावा कुठून ते कळत नाही. तुम्ही नैराश्य झटकून पुन्हा कामाला लागले. कोरोनाचा लॉकडाऊन विस्मरणात गेला. बरं वाटलं. कोरोना काळात काही गोष्टी तुमच्या विस्मरणात गेल्या आहेत. त्याचा फ्लॅश बॅक देतो,असं म्हणत राज ठाकरे यांची तोफ धडाडू लागली.


आपण दोन वर्षात झालेल्या घटना विसरून गेलो. २०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक, दर रोज येणाऱ्या नवीन बातम्या. तुम्ही विसरला. ते विस्मरणात जाऊन कसं चालेल? २०१९ ची निवडणूक आठवा. शिवसेना आणि भाजप एकत्र. विरोधात कोण? तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस. निकाल लागला त्यानंतर उद्धव ठाकरेंना आठवलं की मुख्यमंत्री पद अडीच वर्ष.


नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी व्यासपीठावर एकत्र आलात. पण मध्येच मुख्यमंत्रीपदाची टूम निघाली. नंतर एके सकाळी जुमलाच जुमला. लग्न कुणाचं आणि नवरी कुठली. मग आवाज आला, 'ये शादी नाही हो सकती.' सगळं शांत झालं. एक नंबरचा पक्ष भाजप, दुसरा पक्ष शिवसेना, तिसरा पक्ष कोण? तो तिसऱ्या नंबरचा पक्ष पहिल्या नंबरला भुलवतोय. तुम्हाला काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबर जाण्यासाठी मतदान केलं नव्हतं. पण, आम्ही सगळं विसरून जातो.


नेत्यांची भाषण ऐकली, मतदान केलं आणि चित्र वेगळं दिसलं. उद्या तुम्हाला कुणीही फरफटत न्यावं आणि तुम्ही फरफट जाता. हेच विसरणं सुरूय. मूळ विषय बाजूला न्यायचा. याच गोष्टीचा फायदा हे घेत आलेत. नवाब मलिक जेलमध्ये गेलेत. याच शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. राष्ट्रवादीचे शपथ घेणारे पहिले मंत्री कोण? छगन भुजबळ.. जे अडीच वर्ष जेलमध्ये होते. मग, माझा गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेला. पण, फरक काय पडतो. कारण हे सगळं आम्ही जे करू तेच खरं असं चाललंय आणि आपण विसरत चाललो आहोत. 


आमदारांना घरं देण्याची टूम काढली. कुणी मागितली होती का घरं? आमच्या राजू पाटील यांनी पहिला विरोध केला. आमदारांना कसली घरे वाटताय? एक देवाण घेवाण करू. आमदारांना घर द्या आणि तुमचे फार्महाऊस आम्हाला द्या. यांना पेन्शन कशाला हवी. लोकांची सेवा करायला राजकारण येत ना? मग, त्यांच्या पैशातली घरं आमदारांना? या आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करा. कोणत्या आमदाराने घर मागितलं होत? झालं काय? की कट दिसला यात. प्रत्येक गोष्टीत यांना कट दिसतो. टेंडर कट, सगळंच कट, मग ईडीनेच यांना कट केलं. यशवंत जाधव यांच्यावर ईडीची धाड पडली. किती दिवस? दोन दिवस?  किती खाणार. हल्ली आईवडील 'यशवंत हो' असे सांगत नाहीत तर यशवंत जाधव हो म्हणतात, अशी टीका त्यांनी केली.


आज काल कुठे चालत आहोत ते लक्षात येतच नाही. बेस्टचा कलर बदलला, बदलू देत. रस्त्यावर चालता येत नाही, चालू दे, खड्डा आहे असू दे, याला जबाबदार कोण? तुम्हीच.. कारण तुम्ही विसरता आहात. बेहरामपाडे वाढत आहेत. इतकी वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी काय केले? कुठे आहे हा बेहरामपाडा? मातोश्रीमधून बाहेर पडलात कि समोरच्या रस्त्याला. पण आमचं लक्ष नाही, आम्हाला मते हवीत. अनेक मदरसे असे आहेत कि जिथे काय चालू आहे ते कळत नाही. पाकिस्तानमधून लोक येतात. तिथे राहतात. वस्ती तयार होते. आमचे नगरसेवक, आमदार, खासदार काय करतात. रेशनकार्ड आहे? नसेल तर आम्ही देतो. त्यांना सोई देतो.. मग... आमचीच मारा.. पोलिसांना खरं काय ते विचारा, ते सगळं सत्य सांगतील.


मशिदीवर भोंगे लागले आहेत. कुठू आले ते, कोणत्या नियमात लिहिलंय? हे भोंगे काढावेच लागतील. नाही काढले तर.. आताच इशारा देतोय.. मस्जिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर दुप्पट स्पीकर लावावे आणि हनुमान चालीसा लावा. मी धर्मविरोधी नाही पण धर्माभिमानी आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा मात्र, ती धर्म घरात ठेवावा. रस्त्यावर आणू नका. मला 'आरे ला कारे' म्हणणारी माणसं हवीत आणि कोणत्याही सत्ताधाऱ्यांची तुम्हाला अडविण्याची हिंमत झाली नाही पाहिजे.


ईडीची नोटीस मलाही आली होती. गेलो होतो. आता यांना आली. हे आताच नाही. २०१९ चं सगळं आहे. मुख्यमंत्री पद हवं होतं ना भोगा आता. बाळासाहेबांच्या नावावर काहीही मागून घ्यायचं. बाळासाहेबांच्या स्मारकाला मी विरोध केला होता. माझे काका असूनही मीच विरोध केला होता. तुम्हाला महापौर बंगला आवडला. तो घेतला. इतक्या मुंबईत एकही जागा सापडली नाही? आता तिथे दररोज मिटिंग होतात. गाड्यांची रांग लागलेली असते. बाळासाहेबांचे नाव वापरून सगळं काही ओरबाडायचं सुरु आहे.


तुमचं दुर्लक्ष होतयं म्हणून हे सगळं सुरु आहे. ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली त्यांना मतदान करणार नाही हे ठरवा. मग पहा कसा बदल होतो ते. शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा. या राज्याने देशाला हिंदुत्वाचा विचार दिला. आंबेडकर चळवळीचा विचार दिला. तुम्ही कोण आहात हे विचारून पहा आणि त्यातून एकच विचार आला पहिजे महाराष्ट्र माझा आहे... महाराष्ट्र माझा आहे...