कल्याण : राज्यात गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे अतोनात हाल झाले आहेत. आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने अनेकांनी टोकाचं पाऊल उचललं. अशीच एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमध्ये कर्जबाजारी झालेल्या तरुणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. आठवडाभरात कल्याण-डोंबिवलीमध्ये आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली पूर्वेकडच्या दावडी इथल्या साई गॅलेक्सी या इमारतीत राहणाऱ्या सुरज सोनी या युवकाने आत्महत्या केली. डोंबिवली स्थानक परिसरात सुरजचं मोबाईल दुरुस्तीचं दुकानं होतं. पण लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून सुरजचा व्यवसाय बंदच होता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं सुरजला कठिण होऊन बसलं होतं. त्याने नोकरी शोधण्याचाही प्रयत्न केला, पण त्यातही त्याला अपयश आलं. 


लाईट बिल थकल्याने काही महिन्यांपूर्वी सुरजच्या घराचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता. त्यातच थकलेलं घरभाडं, अन्नधान्याचा खर्च आणि वाढत चाललेली उसनवारी यामुळे सुरज नैराश्यात गेला होता. आणि यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतला. पत्नी आणि मुलांना त्यानं त्यांच्या भावाकडे सोडलं आणि राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली 


सुरजच्यामागे पत्नी, 13 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी असा परिवार असून सुरजच्या जाण्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. 


गेल्याच आठवड्यात कल्याणमधील एका प्रिटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. उल्हासनगरमध्ये बंडू पांडे यांचा प्रिटिंग प्रेसचा व्यावसाय होता. पण गेल्या दीडवर्षांपासून त्यांचा व्यावसाय ठप्प झाला होता. आर्थिक तंगीमुळे खचलेल्या पांडे यांनी नैराश्यातून रविवारी मध्यरात्री घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.