अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : आरोग्य शिबीर न घेताच आरोग्य शिबिराच्या नावाखाली मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठीच्या खर्चाचा रितसर बिलासकट तपशील आहे. 


मंडप आणि साऊंड सिस्टिम - ९ हजार ४४० रुपये, फ्लेक्स, हॅण्डबिल्स, हेल्थ कार्ड - १२ हजार रुपये, चहा-नाष्टा - ५ हजार ५६०, औषध साहित्य खरेदी - ४ हजार रुपये, डॉक्टरांचे मानधन - ९ हजार रुपये, एकूण खर्च- ४० हजार रुपये


मात्र, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या पत्रात ११ मार्च २०१९ रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये, कुठल्याच प्रकारचं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं नव्हतं, अशी माहिती त्यात स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. त्यामुळे याठिकाणी तत्कालीन अधिकाऱ्यांनी आरोग्य शिबिराच्या नावाखाली अपहार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. 


आरोग्य शिबिरातील या अपहाराच्या आरोपाची तालुका आरोग्य अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली. दोषींवर कारवाई करण्यात येईल असं देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.


तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला आहे. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दिलेल्या तारखेला आरोग्य शिबिर झाल्याबद्दल साशंकता असल्याचं त्यांनी चौकशी अहवालात नमूद केलं आहे. हॉस्पिटलचे तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघचौरे यांच्यावर याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.


दरम्यान, पुण्यातील जे.एम.एफ.सी न्यायालयाने याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.