COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देईल, अशी घटना आज कोल्हापुरात घडलीय. शिवसेनेतील नाराज आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारलंय. 'म्हाताऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा आणि तरुणांना संधी द्या' अशी मागणी करत सेनेतील नाराज आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. सेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांत असंतोषाची ठिणगी पडलीय. पक्षात संधी मिळत नसल्याचं सांगत सेनेतील तरुण नेतृत्व पुढे येऊ पाहतंय. ज्येष्ठांच्या फळीमुळे आपली पक्षात घुसमट होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.  कोल्हापूर जिल्ह्यावर अन्याय का ?  असा नाराजी प्रश्न विचारण्यात येत आहे.


सहापैकी एकालाही मंत्रीपद नाही 


 पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखा दिग्गज नेता आहे. यांना शह द्यायचा असेल तर तोडीस तोड राजकारण कराव लागेल अशी भावना या आमदारांची आहे. पण कोल्हापूर, प.महाराष्ट्रातील ६ आमदारांपैकी एकालाही मंत्रीपद नसल्याची खंत सेनेच्या आमदारांनी व्यक्त केली आहे.  'झी २४ तास'च्या सूत्रांच्या माहितीनुसार, 'शिवसेनेच्या मंत्री मंडळात फेरबदल करा... म्हाताऱ्या मंत्र्य़ांना  घरचा रस्ता दाखवा... तरुणांना संधी द्या... अन्यथा नागपूर अधिवेशनावर बहिष्कार टाकला जाईल' अशी तंबीच पक्षातील नाराज आमदारांनी पक्षनेतृत्वाला दिलीय. साहजिकच यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचं दिसून येतंय. 


पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार


राजेश क्षीरसागर, कोल्हापूर
सुजित मिंचेकर, हातकणंगले
उल्हास पाटील, शिरोळ
चंद्रदीप नरके, करवीर
सत्यजीत पाटील, शाहुवाडी
प्रकाश अबीटकर, राधानगरी-भुदरगड
विजय शिवतारे, पुरंदर
अनिल बाबर, खानापूर-आटपाडी, सांगली
शंभुराजे देसाई, पाटण, सातारा


भाजपाला फायदा ?


यावर अधिकृत कोणी बोलायला तयार नाही. पण नाराज आमदारांनी बंडाचे संकेतही दिले आहेत. शेवटचा मंत्रीमंडळ विस्तार असला तरीही अवघ दीड वर्ष राहिलं असताना ही धूसपूस बाहेर येऊ शकते.  शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाला या नाराजीची दखल घेणं भाग आहे अन्यथा भाजप या परिस्थितीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.