मुंबई : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील (midc) रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये 525 औद्योगिक तर 617 निवासी भूखंड  आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रहिवासी भागांपासून 50 मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. 


येथल्या सध्याच्या धोकादायक कारखान्यांना उत्पादनात बदल करून व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाणार आहे. या कारखान्यांना पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रचलित दराने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व उद्योग विभागाने केलेल्या पाहणीनुसार 156 कारखाने रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले.


हे कारखाने असणाऱ्या परिसरात वारंवार अपघात होत आहेत. तसेच, येथील नागरिकांना सातत्याने प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. यासह अन्य मुद्द्यांचा विकर करून हे कारखाने स्थलांतरित करण्याचा अनिर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.