तुषार तपासे, झी मीडिया, मुंबई : छत्रपती उदयनराजेंचा हट्ट पुरा झाला आहे. पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल विरोधकांना कितीही शंका असली तरी विधानसभेबरोबरच सातारा पोटनिवडणूक होणार, हे नक्की झालं आहे. उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून मैदानात उतरावं ही काहींची इच्छा होती.. पण पृथ्वीराज चव्हाणांनी याला स्पष्ट नकार दिला आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र नितीन पाटील यांचं नाव आता चर्चेत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपात आणि मग शिवसेनेत गेलेले नरेंद्र पाटील यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे.


लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना ५ लाख ७९ हजार २६ मतं मिळाली तर नरेंद्र पाटलांच्या पारड्यात ४ लाख ५२ हजार ४९८ मतं पडली.  
साताऱ्याची जागा शिवसेना भाजपासाठी सोडणार आहे... त्या बदल्यात शिवसेनेनं भाजपाकडून काय मागून घेतलंय, याचेही पत्ते अजून खुले व्हायचे आहेत.


साताऱ्यात एकेकाळचे वैरी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही आता भाजपमध्ये आहेत. विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्र होत असल्यानं दोघांनाही एकमेकांना मदत करण्यावाचून पर्याय नाही. साताऱ्यातला राष्ट्रवादी आणि पवारांशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या संस्था, सोसायट्यांची ताकद विरुद्ध उदयनराजेंचे कार्यकर्ते आणि भाजपा-शिवसेनेची ताकद अशी ही रंगतदार लढाई आहे. 


दिवाळीच्या तोंडावर साताऱ्यात फटाके कोण फोडणार, याची तमाम महाराष्ट्रात उत्सुकता आहे.