पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापलं आहे. अश्यातच पुण्यातील पेठांमधील 5 मशीद ट्रस्टनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील वस्ती परिसरात कोणतंही सण उत्सव असलं की डिजे लावल जातं आणि गाणी वाजवली जातात. परंतु, सध्याच्या या जातीय राजकीय परिस्थितीत सामाजिक संदेश देण्यासाठी तसेच फुकट पैशांची उधळपट्टी होऊ नये म्हणून काही महत्वाचा निर्णय घेतला आहे, असं माजी नगरसेवक युसूफ शेख यांनी सांगितलं. 


लोहियानगर परिसरातील पाच मशिदींची एक कोअर कमिटी तयार केली आणि त्यांच्या इमाम आणि कार्यकर्त्याची समुदायातील इतर वरिष्ठ सदस्यांसह बैठक घेतली आणि ईदच्या उत्सवादरम्यान डीजे न लावण्याचा निर्णय घेतला अशी माहिती शेख यांनी दिली.


भारतीय अंजुमन दारुस सलाम, खतीजा मस्जिद, अजिना मस्जिद आणि मोहंमदिया मस्जिद या पाचही मशीद ट्रस्टने ईदच्या दिवशी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवादरम्यान डीजे म्युझिक सिस्टीम खरेदी करण्यासाठी जमा होणारा निधी परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल, असेही ते म्हणाले. 


लोहिया नगर परिसरातील सर्व पाचही मशिदी ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. अजान दरम्यान आवाज नेहमी कमी ठेवला जातो, असा दावाही त्यांनी केला.