आधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या
जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
रत्नागिरी : जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा सत्कार
कोकणातल्या पाच जिल्ह्यांमध्ये २०१५-२०१६ वर्षात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांकरिता २०३ गावांची निवड करण्यात आली. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
पुरस्काराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
या पुरस्कार वितरण सोहळ्यात वणौशी गावाला मिळालेल्या पुरस्काराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. काही महिन्यांपूर्वी केवळ कागदावरच निधी खर्ची पडल्याचे पुरावे सादर करत आणि निकृष्ट दर्जाची कामं समोर आणत वणौशी गावातंल भ्रष्टाचार समोर आणला गेला. या प्रकरणी कृषी विभागाचे सातहून अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत.
दरम्यान या प्रकरणी चौकशी सुरु असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं सांगत, राम शिंदे यांनी यावेळी वेळ मारुन नेली.