यंदा सनबर्न थेट देहू आणि आळंदी प्रवेशद्वारावर
पिंपरी चिंचवडमध्ये सनबर्नच्या निमित्ताने संस्कृतीचे धिंडवडे निघणार आहेत, त्याची ऑनलाईन बुकींग ही सुरु झाली आहे.
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : जगतगुरु संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या, पिंपरी चिंचवडमध्ये सनबर्नच्या निमित्ताने संस्कृतीचे धिंडवडे निघणार आहेत, त्याची ऑनलाईन बुकींग ही सुरु झाली आहे.
मद्याची रेलचेल, त्या धुंदीत थिरकणारी तरुणाई हे चित्र असतं सनबर्न पार्टीचं. यंदा पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये सनबर्न आयोजित केली जाणार आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या वाघोलीमध्ये सनबर्नचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला प्रचंड विरोध झाला होता. यंदा तर सनबर्न थेट तुकाराम महाराजांच्या देहू आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीच्या प्रवेशद्वारावर होणार आहे.
सनबर्न पार्टीचं ऑनलाईन बुकिंग सुरु झालं आहे. पण पोलिस आणि पालिका प्रशासनाला अजून त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळं याबाबत कोणी बोलायला तयार नाही. पण असं असलं तरी आता थेट संतांच्या भूमीत ही पार्टी होत असल्यामुळं त्याला विरोध होणार हे उघड गुपित आहे.