रायगड जिल्ह्यात अंगणवाडीच्या पोषण आहारातील घोटाळा उघड
बघुयात याच संदर्भातील झी २४ तासचा एक स्पेशल रिपोर्ट...
अमोल पाटील, झी मीडिया, रायगड : पोषण आहारात रायगड जिल्ह्यात मोठा घोटाळा उघडकीस आलाय. पोषण आहारात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार असल्यानं एका महिला बचत गटाविरोधात खालापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बघुयात याच संदर्भातील झी २४ तासचा एक स्पेशल रिपोर्ट...
आहारांच्या पाकिटात खाऊ कमी
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका एकात्मिक महिला व बाल कल्याण प्रकल्पाचा THR पोषण आहार घोटाळा समोर आलाय. खालापूर तालुक्यातील अंगणवाडी मार्फत दिला जाणारा THR म्हणजेच टेक होम रेशन अंतर्गत पॅक स्वरूपात दिला जाणा-या खाऊच्या पाकिटांमध्ये खाऊ कमी प्रमाणात आढळून आलाय.
गुन्हा दाखल
खालापूर तालुक्यातील THR पोषण आहार अंगणवाडींना पुरवण्याचे काम चौक येथील आदर्श स्वयंसहायता महिला बचत गटाला देण्यात आले या प्रकारा नंतर पंचायत समिती खालापूर मार्फत खालापूर पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिका-यांचं मौन
दरम्यान, ज्या लाभार्थीना हा THR पोषण आहार देण्यात येतो, तो खाण्याजोगा नसल्याचं समोर आले आहे. तर खालापूर एकात्मिक प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यावर काहीच बोलत नाहीत.
एकट्या खालापूरमध्ये २०० अंगणवाड्या
एकट्या खालापूर तालुक्यात २०० च्या आसपास अंगणवाडी आहेत. कर्जतमध्ये तीनशेपेक्षा जास्त आहेत. खालापूर तालुक्यातील THR पोषण आहाराचे महिन्याचे बिल हे ८ लाखाच्या आसपास आहे. जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत. याचाच अर्थ जिल्ह्यात कोट्यवधी रुपये प्रति महिने या THR पोषण आहारावर खर्च होत आहेत. तर राज्यात हा आकडा किती असेल याची कल्पना न केलेलीच बरी.