Ratan Tata Gets Life Threats: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. फोन कॉलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. यानंतर रतन टाटा यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच, धमकी देणाऱ्या व्यक्तीचाही पोलिसांनी शोध घेतला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन केला आणि रतन टाटा यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितली. जर टाटांची सुरक्षा वाढवली नाही तर त्यांची अवस्था टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्यासारखीच होईल, अशी धमकी दिली होती. या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून त्यांनी रतन टाटा यांच्या सुरक्षेत वाढ केली.


आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाला हे काम सोपवण्यात आले. तपासादरम्यान टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी शोधून काढले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन कर्नाटकात सापडले असून तो पुण्याचा रहिवासी आहे. पोलिस पुण्यातील त्याच्या घरी पोहोचल्यानंतर चौकशी केल्यावर समजलं की गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता असून त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे व शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर कळलं की तो व्यक्ती स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त आहे. तसंच, त्या व्यक्ती इंजिनीअर असून त्याने एमबीए फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान धमकी देणारा स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असल्याने पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.