ठाणे : अंबरनाथमध्ये वडापावमध्ये पाल सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय. अंबरनाथ पूर्व भागातील नामांकित बबन वडापावच्या वड्यात आज सकाळी चक्क मेलेले पालीचं पिल्लू सापडले.  ही घटना समोर आल्यानंतर संतप्त ग्राहकांनी वडापावच्या दुकानात गर्दी केली.  मात्र वडापाव विक्रेत्यानं ग्राहकांना उद्धट उत्तरं देत पिटाळून लावलं. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी बबन वडापावचा मालक बबन पटेल आणि त्याच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेचं गांभीर्य ओळखून अंबरनाथ पालिका कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा बबन वडापाव दुकानाचं फूड लायसन्स संपल्याची बाब निदर्शनास आली. धक्कादायक बाब म्हणजे दुकानातल्या कर्मचाऱ्यांनी वडापावमध्ये पाल आढळल्याची घटना खरी असल्याची कबुली दिली. पोलीस आणि एफडीएनं देखील या वडापाल प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई सुरु केलीय. 



वडापाव दुकानाचा मालक बबन पटेल आणि तिघा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा वडापाव विक्रेत्यांवर आधीच कारवाई का केली जात नाही, असा सवाल आता केला जातोय. अंबरनाथमध्ये वडयात पाल सापडल्या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर  पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.