महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ३ रुग्ण, रुग्णांची संख्या ५२, ५ जणांना डिस्चार्ज देणार
मुंबई, पुणे आणि पिंपरीत कोरोनाचे तीन नवे रुग्ण
राज्यात मुंबई, पुणे आणि पिंपरीमध्ये कोरोनाचे आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. गर्दी कमी करण्यासाठी आणखी महत्वाचे निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. अन्य देशातून येणाऱ्या विशेषतः अरब देशांमधून येणाऱ्या सुमारे ३० हजार नागरिकांना पूर्ण तपासणी करून आणि काळजी घेऊन भारतात आणलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
आरोग्यमंत्री टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्वाचे मुद्दे
१. राज्यात सध्या १०३६ लोक विलगीकरण कक्षात आहेत.
२. आतापर्यंत ९७१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
३. कोरोनामुक्त झालेल्या ५ जणांना डिस्चार्ज दिला जाईल.
४. सध्या ६ लॅबमधून चाचणी होत आहे. आणखी २ वाढतील. पुढच्या १० दिवसांत १२ लॅबमधून रोज २४०० टेस्ट केल्या जाऊ शकतील.
५. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करू नये
६. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून निगेटिव्ह असलेल्यांना राज्यात आणलं जाईल. त्यांना क्वारंटाईनसाठी तुर्भे इथं अनिल अंबानी यांच्या रुग्णालयात ठेवण्यात येईल.
७. परदेशातून विशेषतः अरब देशातून येणाऱ्या सुमारे ३० हजार लोकांना पूर्ण तपासणी करून आणि काळजी घेऊन भारतात आणलं जाईल.
८. गर्दी कमी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज निर्णय जाहीर करतील.
९. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रतिसाद द्यावा.
१०. पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी संध्याकाळी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत