Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल
Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.
Nitin Gadkari Threat : नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Nitin Gadkari Receives Threat Call)
पोलिसांनी सांगितले की, गडकरी यांच्या कार्यालयात आज लागोपाठ तीन कॉल आले. 10:55 वाजता आलेल्या पहिल्या कॉलमध्ये बोलणे झाले नाही. मात्र 11 आणि 11:55 वाजता आलेल्या पुढील दोन कॉलमध्ये धमकी देणाऱ्याने जयेश पुजारी बोलत असल्याचे म्हटले आहे. त्याने दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसेच याची वाच्यता पोलिसांकडे करु नये, असा इशाराही दिला. सोबतच त्याने संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांकही दिला.
गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आलेत. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा त्याच जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी धमकीचे 3 कॉल आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. धमकी देणारा जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही. सकाळच्या सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उत्तरप्रदेशातील नोएडा येथे कार्यक्रम होता आणि संध्याकाळी नागपुरात एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्याआधी धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी झी मीडियाला सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 10 कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा फोन आला होता. धमकीनंतर अशीही माहिती समोर आली आहे की, पैशांच्या संभाषणासाठी जो नंबर देण्यात आला होता तो बंगळुरु येथील एका मुलीचा होता. त्या मुलीला याबाबत काहीच माहिती नव्हती, असेही पोलिसांनी सांगितले आहे
पण त्या मुलीचा मित्रही बेळगाव कारागृहात होता, त्यामुळे मागच्या वेळी बेळगाव कारागृहात खुनाचा आरोपी जयेश कंठा उर्फ जयेश पुजारी याने त्याला फोन केला, यावेळीही त्याने फोन केला, तरुणीचा मित्र कारागृहात आहे, पोलीसही माहिती घेत आहेत.