देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, इरसालवाडी : गुरुवारची पहाट उजाडली तीच धक्कादायक आणि वाईट बातमीने. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इरसालवाडी हे अख्खं गाव दरड कोसळून दबलं गेलं. एक होतं इरसालवाडी... असं म्हणण्याची दुर्दैवानं वेळ आलीय. रात्री पाऊस असा काही कोसळला की पावसाबरोबर डोंगरच खाली आला आणि अख्खं गावच डोंगराखाली दबलं गेलं. गुरुवारची पहाट उजाडण्याआधीच लेकरं बाळं, बायाबापड्या, गुरंढोरं सारं काही डोंगराखाली गाडलं गेलं.  रायगडमधल्या खालापूर तालुक्यात इर्शाळगडच्या पायथ्याशी हे गाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाव साधारण दोनशे-अडीचशे लोकवस्तीचं आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत कर्जत, पनवेल आणि माथेरानच्या साधारणपणे मध्यभागी वसलेलं इरसालवाडी. बुधवारी रात्री गावातले बहुतेक लोक झोपले असताना दरड कोसळली. दरड कोसळण्याआधी मोठ्ठा आवाज झाला. जे जागे होते ते वाट मिळेल तिथं धावले. 


काय घडलं नेमक?


बुधवारी रात्री 10.30वाजता  मासेमारी करून गावातले काही लोक परतत होते. पुढच्या अर्ध्या तासात  डोंगराचा काही भाग खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आले.  काही वेळातच घरं मातीखाली गेल्याचं त्यांना समजलं. रात्री 11.30 वा. सरपंच आणि काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. रात्री 12 वाजता स्थानिक पोलीस, तहसील कार्यालयाला माहिती समजली. रात्री 12.30 ला  पोलीस, रुग्णवाहिका, प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री 1 ते 1.30 वाजता आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. मध्यरात्री 3.30 वाजता  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले.  पहाटे 4 वाजता  मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळावर दाखल झाले. पहाटेच्या सुमाराला एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं


डोंगरातून फक्त एक पायवाट जाते


गावात जायला बांधलेला रस्ता नाही. डोंगरातून फक्त एक पायवाट जाते. रस्ता नाही, दरड कोसळण्याची भीती, चिखल आणि सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस त्यामुळे बचावकार्यात बरेच अडथळे येत होते. सकाळी सव्वा सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले... गावातून वाचलेल्या आणि पायथ्याशी थांबलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. त्यांना धीर दिला, सांत्वन केलं. मुख्यमंत्री पायवाटेनं प्रत्यक्ष डोंगर चढून वर घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी केली.  तिथे उपस्थित असलेल्या गिरीश महाजनांकडून अधिक माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आदित्य ठाकरे, अनिल परब, सुनील प्रभू यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.


दरड कोसळून गावंच्या गावं जमिनीच्या पोटात गावं गायब झाली


माळीण, तळिये आणि आता इरसालवाडी. दरड कोसळून गावंच्या गावं जमिनीच्या पोटात गावं गायब झाली. मात्र, इरसालवाडी धोकादायक यादीत नव्हतं, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. इरसालवाडी गावातूनच इर्शाळगडचा ट्रेक सुरू व्हायचा.  धुक्यानं वेढलेलं, हिरव्यागार डोंगरात वसलेलं असं प्रेमात पडावं इतकं सुंदर हे गाव. मात्र, आता इरसालवाडी गाव नकाशावरुन पुसलं गेलं. उरलीय ती फक्त चिखल-माती आणि डोळ्यांतून वाहणारं पाणी.


ज्यांनी माणसं गमावली त्यांच्या कहाण्या सुन्न करणा-या 


इरसालवाडीतल्या ढिगा-याखाली अजूनही काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जातेय.  आपली माणसं परत येतील म्हणून अनेकांचे डोळे डोंगराकडे आणि बचावकार्याकडे लागलेत. ज्यांनी माणसं गमावली त्यांच्या कहाण्या सुन्न करणा-या आहेत.  इरसालवाडी गाव डोंगराच्या पोटात लुप्त झालं ते अनेक जिवाभावाच्या माणसांना आणि घर-संसारांना घेऊनच. रात्री साडे दहा वाजता डोंगर खाली आला त्यावेळी जे जागे होते ते सैरावैरा पळत सुटले. जीव मुठीत धरुन धावले आणि कसेबसे बचावले.  त्या काळरात्रीनं मोहन पारधी यांच्या कुटुंबातले दोघे दगावलेत. आठ जणांचं हे कुटुंब रात्री झोपलं असताना मोठा आवाज झाला. भिंत अंगावर पडली. तान्ह्या बाळाच्या अंगावर विटा पडल्या.. रात्रीच्या अंधारात बाळाचे फक्त पाय दिसले. त्याच्या अंगावरची माती उकरुन मोहन पारधी, बायको, वडील आणि मुलाला घेऊन धावत सुटले. त्यांचा भाऊ आणि काका या दुर्घटनेत दगावलेत. रात्रीच्या अंधारात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे जे उठले आणि डोंगर खाली येण्याआधी काही सेकंदात जे बाहेर पडू शकले. तेच मृत्यूला चकवा देऊ शकले.