माळशेज घाटातील अपघाताचा थरारक Video; नॅनो कारला धडकल्यानंतर इनोव्हा 30 फुट खोल दरीत कोसळली
माळशेज घाटात अत्यंत थरारक अपघात झाला आहे. नॅनो आणि इनोव्हा कराची धडक झाली. यानंतर इनोव्हा कार थेट 30 फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : पावसामुळे माळशेज घाट परिसरातील धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत. माळशेज घाट परिसरातील निसर्ग सौंदर्य ही बहरलंय पावसामुळे माळशेज घाटातील धबधब्यांवर पर्यटक गर्दी करु लागले. माळशेज घाटात विचित्र अपघात (Malshej Ghat Accident) झाला आहे. नॅनो कारला धडकल्यानंतर इनोव्हा 30 फुट खोल दरीत कोसळली. स्थानिकांच्या या अपघातात प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात इनोवा कार आणि नॅनो कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दोन्ही वाहनांमधील प्रवासी पांगुळ गव्हाण गावाजवळ पर्यटनासाठी आले होते. या भीषण अपघतात दोन्ही वाहनांमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
इनोव्हा 30 फुट खोल दरीत कोसळली
माळशेज घाटात इनोवा कार आणि नॅनो कार यांची समोरासमोर धडक झाली. यावेळी इनोव्हा कार दरीच्या सुरक्षा कठड्यावर अडकली. कारचा अर्धा भाग रस्त्यावर आणि अर्धा भाग दरीच्या सुरक्षा कठड्यावर अशा स्थितीत ही कार होती. स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. तात्काळ इनोव्हा कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. यानंतर ट्रकला दोरखंड बांधून दोरखंडाच्या मदतीनी कठड्यावर अडकलेली इनोव्हा कार बाहेर काढण्यात येत होती. मात्र, इनोव्हा कारचा सपोर्ट तुटला आणि कार थेट 30 फूट खोल दरीत कोसळली. कार दरीत कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वेळीच प्रवाशांना बाहेर काढल्याने इनोव्हा कारमधील 5 प्रवासी बचावले आहेत. तर, नॅनो कारमधील दोन प्रवाशांना देखील कोणतीही इजा पोहचलेली नाही.
माळशेज घाटात पर्यटकांची तुफान गर्दी
माळशेज घाटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू घाटातील जांभळी धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या परिसरात कलम 144 लागू केला आहे. मात्र, कल्याण नगर महामार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी या धबधब्याचा आनंद घेत आहेत.