नागपूर : विवाहित महिलेच्या अंगावर I LOVE YOU, कविता किंवा शायरी लिहिलेलं पत्र फेकणं हा गुन्हा मानला जाईल आणि असं करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात छेडछाड किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. राज्यातील अकोला जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेची सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एका 45 वर्षीय महिलेबरोबर अश्लिल वर्तन आणि तिला धमकी दिल्याचा आरोप एका 54 वर्षीय व्यक्तीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेची छेडछाड किंवा विनयभंग प्रकरणात आरोपीविरोधात 354 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला जातो. यात दोषी आढळल्यास आरोपीला दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड भरावा लागतो. 


नेमकी घटना काय आहे


एका 54 वर्षीय व्यक्तीवर 45 वर्षीय महिलेची छेडछाड आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. नागपूरमधल्या अकोला जिल्ह्यातील 2011 मधली ही घटना आहे. पीडित महिला ही विवाहित आहे आणि तिला एक मुलगा आहे. आरोपीने या महिलेला प्रेम पत्र देण्याचा प्रयत्न केला, या महिलेने प्रेम पत्र घेण्यास नकार दिला.


विवाहितेने पत्र घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने प्रेम पत्र महिलेल्या अंगावर फेकलं आणि तिला I LOVE YOU म्हटलं. ही गोष्ट कुणालाही सांगू नको अशी धमकीही त्याने या महिलेला दिली. 


महिलेच्या तक्रारीनंतर अकोला सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसंच प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायलयानेही आरोपीला दोषी ठरवलं आहे.


या प्रकरणात न्यायालयाने म्हटलं आहे, महिलेची अब्रु हाच तिचा सर्वात मोठा दागिना आहे. विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा कविता लिहिलेलं पत्र फेकणं हे ही विनयभंग आणि छेडछाडीचं प्रकरण आहे.