गरम वाघोबाही झाले `थंडा थंडा, कूल कूल`
प्रचंड उन्हामुळे या प्राण्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेने एक युक्ती आखलीय.
औरंगाबाद : राज्यात उष्णतेचा पारा ४० अंशावर गेलाय. उन्हाच्या तीव्र झळांनी सर्वजण घामेजून गेलेत. या प्रचंड उष्माघाताचा तर आता प्राण्यांनाही जाणवू लागलाय. प्रचंड उन्हामुळे या प्राण्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेने एक युक्ती आखलीय.
औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघांसाठी ही खास सोय करण्यात आली असून उन्हाच्या काहिलीतही हे वाघोबा 'थंडा थंडा, कूल कूल' अनुभव घेत आहेत.
सिद्दार्थ प्राणी संग्रहालयात 12 वाघ आणि 2 बिबट्या आहेत. या वाघोबांना दिवसातून दोनदा थंड पाण्याने अंघोळ घातली जातेय. वाघांना उन्हाचा त्रास जाणावा यासाठी त्यांच्या पिंजऱ्याजवळ पाण्याचा हौदही बनवण्यात आला आहे. इतकेच नव्हेत तर त्यांच्या पिंजऱ्याजवळ खास कूलरही बसवण्यात आले आहेत.
दिवसातून 2 वेळा होणारी ही अंघोळ सध्या वाघोबाही एन्जॉय करताहेत. अंघोळीच्यावेळी हे सगळे वाघोबा रांगेत जवळजवळ उभं राहून पाण्याचे तुषार आपल्या अंगावर झेलत एन्जॉय करत असल्याचे दृश्य दिसतंय.
अंघोळ झाल्यावर पिंजऱ्यातून बाहेर येत हे वाघोबा महाशय झाडाखाली ताणून देताय. त्यांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी प्रशासनाने ही सगळी उपाययोजना सुरु केलीय. या वाघांसोबतच इतर प्राण्यांचीही विशेष काळजी येथे घेतली जातेय.