पुणे : टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला एक नवं वळणं लागलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली नसून ती चक्कर येवून पडली असं सांगण्यात येत आहे. पूजासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना जबाबात माहिती दिली आहे. शिवाय पूजाच्या रूममध्ये वाईनच्या बाटल्या सापडल्याची माहिती देखील समोर येत आहे. पूजाने दारू प्यायली होती की तिला दारू पाजण्यात आली होती? असे एकना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पूजाचा भाऊ विलास चव्हाण आणि त्याचा मित्र अरुण राठोड यांचे जबाब नोंदवलेत. पूजाच्या रुममध्ये दारुच्या बाटल्या सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वानवडी पोलिसांनी याआधीच पूजाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवलाय... याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेत. 



पूजाच्या मृत्यूनंतर तब्बल १२ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल झाल्यात. या क्लिपमध्ये तीन व्यक्तींचं बंजारा भाषेतील संभाषण आहे. यापैकी एक आवाज शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिप्सचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येणार आहे.


तर पोलिसांनी बंजारा भाषेतल्या या ऑडिओ क्लिपच्या भाषांतराचं काम देखील सुरू केल्याचं समजत आहे. दरम्यान, पूजाच्या मृत्यूबाबत बंजारा समाजातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर माझी बहीण वाघीण आहे. ती आत्महत्या करणार नाही, अशी पोस्ट पूजाची लहान बहीण दिया चव्हाण हिनं इन्स्टाग्रामवर टाकली. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, याचं गूढ आणखी वाढलं आहे.